K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी
भारतात ‘स्टारलिंक’च्या उपग्रह-आधारित दळणवळण सेवेला अडथळा आणणाऱ्या कथित ‘धनदांडग्यांची’ नावे जाहीर करून त्यांना उघडे पाडावे, अशी मागणी बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव (K. T. Rama Rao) यांनी उद्योगपती एलॉन मस्क यांच्याकडे गुरुवारी केली.

K. T. Rama Rao : भारतात ‘स्टारलिंक’च्या उपग्रह-आधारित दळणवळण सेवेला अडथळा आणणाऱ्या कथित ‘धनदांडग्यांची’ नावे जाहीर करून त्यांना उघडे पाडावे, अशी मागणी बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव (K. T. Rama Rao) यांनी उद्योगपती एलॉन मस्क यांच्याकडे गुरुवारी केली.
एलॉन मस्क यांनी त्या धनदांडग्यांची नावे जाहीर करावीत आणि त्यांना उघडे पाडावे. आपल्या सरकारवर कोणाची अशी पकड आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे रामाराव (K.T.Rama Rao) यांनी आपल्या ‘सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले.
एलॉन मस्क यांनी बुधवारी भारतातील काही ‘धनदांडगे’ आपली मक्तेदारी टिकवण्यासाठी ‘स्टारलिंक’च्या सेवा रोखत असल्याचा आरोप केला होता. देशातील ११ हजारांहून अधिक गावांमध्ये मोबाईल कव्हरेज उपलब्ध नसल्याबाबत ‘डॉजडिझायनर’ या सोशल मीडिया हँडलने केलेल्या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी हा दावा केला.
भारतीय जनतेवर आपली मक्तेदारीची पकड कायम ठेवण्यासाठी काही धनदांडग्यांकडून आम्हाला रोखले जात आहे, असे मस्क यांनी म्हटले होते. हे कोण आहेत, याचा अंदाज लावता येतो, असेही त्यांनी सूचित केले. मस्क यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत रामाराव (K.T.Rama Rao) यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधत कथित प्रभावशाली व्यावसायिकांची नावे जाहीर करण्याची मागणी केली.






