कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी गडकरींचे उद्योजकांना आवाहन

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करावं लागलं. यामुळे कोरोना विषाणूला अटकाव तर झाला मात्र अर्थचक्र गाळात रुतलं. आता कोरोनाचा प्रसार रोखणं आणि विसावलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती देणं अशी दुहेरी जबाबदारी सरकारच्या खांदयावर आली आहे.
अशातच, ‘कोरोनामुळे संथ झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती देण्यासाठी, देशातील उद्योजकांनी सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून प्रकल्प हाती घ्यावेत. सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल’ असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
यावेळी बोलताना गडकरी यांनी, ‘बँका, वित्तीय संस्था, पायाभूत सुविधा, एमएसएमई, कृषी आणि उद्योग यांनी एकत्रितपणे मागणी निर्माण करण्याची प्रक्रिया राबवून अर्थव्यवस्थेतील तरलतेची गरज सोडविण्याची गरज आहे.’ असं मत देखील व्यक्त केलं.
आज आयोजित करण्यात आलेल्या नूतनीकरणयोग्य ऊर्जा उत्पादन परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी, “सद्य स्थितीत अर्थव्यवस्थेसमोर अनेक अडचणी आहेत. सरकारची भूमिका सकारात्मक व पाठिंबा देण्याची असून आम्ही व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहोत. मात्र ही वेळ सर्व भागधारकांनी सहकार्य करण्याची आहे.” असं सांगितलं.





