Nagar | नेवासा मतदारसंघात पुन्हा एकदा गडाख विरुद्ध मुरकुटे

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांचीच उमेदवारी अखेर महायुतीच्या पक्षीय पातळीवर भाजपाकडून निश्चित झालेली असून केवळ घोषणाच बाकी असल्याचे मुरकुटे यांच्या निष्ठावंत समर्थकांतून बोलले जात आहे.
त्यामुळे आता पुन्हा सोशल मीडियावर जयहरी पुन्हा… अशा आशयाचे सोशल वॉर सुरू झालेले आहेत.
महाविकास आघाडीकडून राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे वर्षभरापासून जनतेच्या संपर्कात आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि विविध गावच्या तालुक्यातील ज्वलंत समस्यांची सोडविणूक करून विकासात्मक कामांना चालना देत आहेत.
महायुतीकडून उमेदवारीसाठी भाजपाकडून डझनभर पक्षांतर्गत इच्छुक मंडळी असल्यामुळे ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्यासाठी पक्षीय पातळीवर जोरदार प्रयत्न पडद्याआडून करण्यात आलेले होते.
शेवटी नेवासा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी अखेर शेवटी भाजपाकडेच नेहमीप्रमाणे वळविण्यात आली आहे.
भाजपाचे प्रमुख दावेदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावामध्ये माजी आमदार मुरकुटे यांच्या नावावर वरिष्ठ पातळीवर हिरवा कंदिल मिळाला असून, नवराञोत्सवानंतर मुरकुटे यांच्या नावाची अधिकृत घोषणाही होणार असल्याचे मुरकुटे समर्थकांतून बोलले जात आहे.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून पक्षीय पातळीवरील महायुती धर्म टिकविण्यासाठी आपल्या प्रमुख पक्षातील एकमेकांच्या ना’राज’ नेतेमंडळींना ऐनवेळी कोणीही आणि कोणत्याही नेत्यांचा आपापल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये आणि निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती अंतर्गत मतभेद निर्माण न होण्यासाठी महायुतीकडून अलिखित प्रवेश बंदी झाली आहे.
त्यामुळे काही चूलबूलपांडे नेतेमंडळींना चांगलीच चपराक बसल्याचे राजकीय रणांगणात बोलले जात आहे. त्यामुळे आता नेवासा विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा गडाख विरुद्ध मुरकुटे असा सामना रंगणार असल्याचे मुरकुटे समर्थकांतून बोलले जात असून, मुरकुटे यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे तालुक्यात रंगलीआहे.





