G20 Summit India : बॉम्बच्या अफवेने दिल्ली पोलिसांची तारांबळ; मध्यवर्ती भागात सापडली बेवारस बॅग

नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण दिल्लीत गेले काही दिवस कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. आणि आता प्रत्यक्ष ही परिषद सुरूही झाली आहे. या पार्श्वभूमीवर जामा मशिद परिसरात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने पोलिसांची मात्र आज चांगलीच तारांबळ उडाली.
ही माहिती मिळाल्यानंतर अनेक सुरक्षा यंत्रणा तिकडे धावल्या परंतु ही अफवाचे असल्याचे निष्पन्न झाले. तेथे आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नाही, त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला.
जामा मशिदीच्या परिसरात एक बेवारस बॅग रस्त्यावर पडलेली आढळली त्यातून ही अफवा पसरली होती. एका मुलाला ही बॅग दिसल्यानंतर त्याने तशी शंका व्यक्त केली होती पण बॅगेत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.
दिल्लीत सध्या बहुपदरी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. त्यात लष्कराची स्फोटके हाताळणारी यंत्रणाहीं तैनात आहे. परंतु त्यांना येथे येण्याची गरज भासली नाही. दिल्ली पोलिसांच्या पथकानेच या अफवेचा सोक्षमोक्ष लावला.





