G. Kishan Reddy : तेलंगणाच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा; केंद्रीय मंत्री किशन रेड्डींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी तेलंगणातील काँग्रेस सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे.

G. Kishan Reddy : केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी तेलंगणातील काँग्रेस सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याच्या आर्थिक स्थितीवर सरकारने एक व्यापक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना लिहिलेल्या खुल्या पत्राद्वारे केली आहे.
किशन रेड्डी यांनी पत्रात नमूद केले की, २०१४ मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्याची तिजोरी अतिरिक्त निधीने भरलेली होती. मात्र, बीआरएसची १० वर्षांची सत्ता आणि गेल्या २७ महिन्यांची काँग्रेसची राजवट या काळात कोणतीही ठोस आर्थिक प्रगती झालेली नाही.
राज्यातील दरडोई कर्ज सातत्याने वाढत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला पूर्णपणे नवीन कर्जांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे राज्याच्या आर्थिक आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देत किशन रेड्डी म्हणाले की, “एककीकडे रेवंत रेड्डी राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे गांधी कुटुंबासाठी १,००० कोटी रुपये देण्याची भाषा करतात. यावरून तिजोरी शून्य असली तरी काँग्रेस नेत्यांचे खिसे भरलेले आहेत हे स्पष्ट होते.
खरी परिस्थिती मांडावी
रेड्डी यांनी दावा केला की, केंद्रातील एनडीए सरकारने गेल्या १२ वर्षांत तेलंगणाला विविध योजनांच्या माध्यमातून १२ लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच, केंद्राच्या ‘व्याजमुक्त कर्ज’ योजनेअंतर्गत मिळालेल्या १०,००० कोटी रुपयांचा वापर करूनच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आता राज्य सरकारने जनतेसमोर राज्याच्या वित्ताची खरी परिस्थिती मांडावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.





