Parth Pawar : “इथून पुढील निर्णय कोअर कमिटीला विचारुन घेतले जाणार” – पार्थ पवार
या बैठकीला पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार, नेते पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, कमिटीचे सदस्य दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित होते.

Parth Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांचा गट हा पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा होती. बैठकीत या सगळ्यावर पूर्ण तोडगा निघाला नाही. मात्र, पार्थ पवार यांनी या बैठकीत इथून पुढे कोअर कमिटीला विचारुन निर्णय घेतले जातील, असा शब्द दिल्याचे माहिती आहे.
या बैठकीला पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार, नेते पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, कमिटीचे सदस्य दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित होते. कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून आले.
पार्थ पवार यांच्या आदेशाने अलीकडेच राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती केली होती. या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विचारात न घेतल्याने राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांचा गट नाराज झाला होता. त्यामुळे या नियुक्त्यांबाबत फेरविचाराची शक्यता वर्तविली जात होती.
मात्र, आजच्या बैठकीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या कायम राहतील, हे स्पष्ट झाले. मुंबई अध्यक्ष म्हणून झिशान सिद्धकी आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटील पुढील सहा महिने काम करतील.
सहा महिन्यातील काम पाहून नंतर निर्णय घेऊ, अशी भूमिका पार्थ पवार यांनी बैठकीत मांडली. तसेच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदांबाबतचा संभ्रम अद्यापही कायम असल्याची माहिती आहे.






