Pune District : मुळशीत निधी कमी पडू देणार नाही

पौड : भोर विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी दिली व मुळशीकरांनी भक्कम साथ देत 53 हजार मतांचे मताधिक्य दिले. यामुळे विजय सहजसोपा झाला. पुढील काळात मुळशी तालुक्यात विकासाची गंगा वाहणार असून निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी बावीस मैल (ता. मुळशी) येथे उपस्थितांना केले.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढावळे – कळमशेत यांच्या वतीने आमदार शंकर मांडेकर यांची भोर, राजगड, मुळशीच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जेसीबीमधून फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.
यावेळी मांडेकर बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी केले होते. यावेळी सरपंच पल्लवी कंधारे, उपसरपंच वैशाली घनश्याम वाटाणे, माजी सरपंच अनंता कंधारे, माजी उपसरपंच निलेश धनावडे, रामआप्पा कंधारे, बंडू वाटाणे, शांताराम शिर्के, लहूशेठ चव्हाण, गुलाबभाऊ कंधारे, संतोष येणपुरे, सुरेखा चौधरी, राजेंद्र कंधारे, सोमनाथ येणपुरे, गणेश शिर्के, अशोक जोरी, राहुल सोनवणे, प्रकाश सोनवणे, विजय भालेराव उपस्थित होते.





