Satara News : येडोबा मंदिर परिसरासाठी 4 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर

कोयनानगर : पाटण विधानसभा मतदारसंघात जलपर्यटनासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला असून पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरात 4 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून याठिकाणी जेट्टी, बोट थांबा, पर्यटक केंद्र, स्वच्छतागृह अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत.
कराड- चिपळूण महामार्गावरील येराड प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे दररोज हजारो भाविक भेट देतात. येथे जलपर्यटनाच्या संधी ओळखून हे ठिकाण बोटिंगसाठी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेळवाक ते पापर्डे दरम्यान दोन बोटिंग स्पॉट तयार करण्यात येणार आहेत. या संदर्भात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी श्री येडोबा मंदिर परिसराची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली.
येराड परिसरात जलपर्यटनासोबतच भाविकांसाठी सुविधा वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन विकास महामंडळामार्फत या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करून स्थानिक रोजगार, पर्यटकांची सोय आणि आर्थिक घडी सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
श्रद्धा आणि विकासाचा संगम – श्री येडोबा देवस्थानासाठी प्रादेशिक योजनेतून प्रथमच निधी मिळणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी श्रध्देने प्रेरित होऊन श्री येडोबा देवस्थानासाठी विकासकामांना अग्रक्रम दिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून हा परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे.





