गंगा शुद्धीकरण प्रकल्पाचा निधी वापरलाच नाही; बिहार सरकारवर ‘कॅग’चे ताशेरे

पाटणा – केंद्राच्या ‘नमामि गंगे’ कार्यक्रमांतर्गत पाटणाशहरातील सांडपाणी सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या निधीचा मोठा भाग खर्चच न केल्याबद्दल कॅगने बिहार सरकारवर कडक ताशेरे मारले आहेत.
कॅग ऑडिटमध्ये असे आढळून आले की 2016-17 ते 2019-20 या कालावधीत केवळ 16 ते 50 टक्के निधी वापरला गेला. परिणामी 683.10 कोटी रुपयांचा मोठा निधी बॅंक खात्यात तसाच पडून राहिला. पाटणा शहरात जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती दोनशे वर्षांपुर्वीची आहे. पण ती सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे.
त्यातून दुषित सांडपाणी गंगेत मिसळत असून त्यामुळे गंगेचे प्रदुषण तसेच राहिले आहे. बिहार मधील गंगेच्या पाण्याचे नमूने तपासण्यात आले असता ते पाणी वापरण्याच्या लायकीचे राहिलेले नाही असे आढळून आले आहे.
सांडपाणी सुविधा दुरूस्त करण्यासाठी व तेथील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही एजन्सी नेमण्यात आल्या होत्या, पण त्यांनीही निर्धारीत वेळेत काम केलेले नाही त्याबद्दलही कॅगने आपल्या अहवालात असमाधान व्यक्त केले.





