Vaibhav Suryavanshi: बिहारच्या नितीश सरकारने वैभव सूर्यवंशीसाठी उघडली तिजोरी, ‘इतके’ लाख देण्याची घोषणा

पाटणा- बिहारच्या समस्तीपुरचा 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2025 मध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 35 चेंडूंमध्ये शतक ठोकून वैभवने सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी वैभवला 10 लाख रुपयांच्या सन्मान राशीची घोषणा केली आहे.
नीतीश कुमार यांनी केले कौतुक –
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी वैभवशी फोनवर संवाद साधत त्याला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “वैभव सूर्यवंशी त्याच्या मेहनतीने आणि प्रतिभेने भारतीय क्रिकेटमधील नवी आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे. तो भविष्यात भारतीय संघासाठी नवे विक्रम प्रस्थापित करेल आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल.” यापूर्वी 12 डिसेंबर 2024 रोजी वैभवने मुख्यमंत्री निवासस्थानी नीतीश कुमार यांची भेट घेतली होती, तेव्हाही त्यांनी वैभवच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
उपमुख्यमंत्र्यांनीही केले अभिनंदन –
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही वैभवचे अभिनंदन केले. त्यांनी ‘X’ वर लिहिले, “वैभव सूर्यवंशीच्या आयपीएलमधील अप्रतिम कामगिरी आणि प्रतिभेला सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी 10 लाख रुपयांची प्रोत्साहन राशी जाहीर केली आहे. वैभववर प्रत्येक बिहारीला गर्व आहे. एनडीए सरकार खेळाडूंच्या प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत आहे.”
MadeInRajasthan.mp4 💗 https://t.co/LKeSlAZsTb
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2025
वैभवची ऐतिहासिक कामगिरी –
वैभवने 28 एप्रिल 2025 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतकी खेळी केली, ज्यामध्ये 11 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात वेगवान शतकी खेळी ठरली. वैभवने यूसुफ पठानचा 37 चेंडूंमधील शतकाचा विक्रम मोडला आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू बनला.
वैभवने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले, जे क्रिकेट विश्वात कधीच विसरले जाणार नाहीत.
सर्वात कमी वयात शतक –
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच नव्हे, तर संपूर्ण प्रोफेशनल क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी वयात (14 वर्षे) शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूने इतक्या कमी वयात शतक झळकावले नव्हते.
वैभवने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयातील शतकासह सर्वात वेगवान भारतीय शतकाचा विक्रमही नोंदवला. त्याने यूसुफ पठाणचा 2008 मधील 37 चेंडूंमधील शतकाचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे, यूसुफने हा विक्रम केला तेव्हा वैभवचा जन्मही झाला नव्हता. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे (30 चेंडू).
वैभवने आयपीएल कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये सर्वाधिक 16 षटकार ठोकले, ज्यामुळे त्याने ब्रेंडन मॅक्युलमच्या 15 षटकारांचा विक्रम मोडला. तसेच, गुजरातविरुद्ध एका डावात 11 षटकार मारून त्याने मुरली विजयचा एका सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा भारतीय विक्रमही मोडला. यासह तो आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला.
वैभवने केवळ 10.2 षटकांत शतक पूर्ण करून सर्वात कमी षटकांत शतक ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. हा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 8.5 षटकांत शतक पूर्ण केले होते.





