विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती : विकासाच्या प्रक्रियेत विद्यालयांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा पाया रचला जातो. विद्यालयात शैक्षणिक दर्जा उंचावण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असते. विद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
चांदुर बाजार येथील उर्दू विद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त 50 लक्ष रुपयांच्या निधीतुन विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्याप्रसंगी आयोजित भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उर्दू विद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, वाचनालय, खेळाचे मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या मुलभूत सुविधांच्या निर्मितीसह सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. विद्यालयाच्या परिसरात हिरवळ राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूची झाडे लावण्यात यावी. या सर्व बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.चांदुर बाजार येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.
वैशिष्ठ्यपूर्ण निधी अंतर्गत नगर परिषदेच्या कक्षेत 8 कोटी 12 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त 1 कोटी 4 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध प्रस्तावित कामांचे भुमिपूजन त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयाच्या प्रशासकिय इमारतीचे बांधकाम, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम, रस्ता रुंदीकरणाचे काम व रस्ता चौपदरीकरणाचे काम व मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन असे 48 कोटी 33 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतुन विकासकामांचे भुमिपूजन राज्यमंत्री कडू यांनी केले.




