Pimpri : निधीसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नव्याने विकसित होणारा भाग, समाविष्ट गावांमधील जलनि:सारण व्यवस्था, नवीन जलवाहिनी निर्माण करणे, पाणी पुरवठा नवीन जलस्त्रोत आणि प्रकल्प मार्गी लावणे आणि त्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होण्यासाठी शहरातील आमदार हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार आहोत.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी माहिती दिली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप व विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील पर्यावरण संवर्धन आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानानुसार जलवाहिनींची देखभाल दुरूस्ती करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता आणि गुणवत्ता वाढवणे. हवा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, पवना बंद पाइपलाइन, मिळकतकर सर्व्हेक्षण, लाइट हाऊस, कॅन्सर हॉस्पिटल थेरगाव, सारथी हेल्पलाइन सक्षमीकरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विकासकामांना गती देण्याबाबत सर्वोतोपरी सकारात्मक कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली आहे. या बैठकील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या विकासाची घोडदौड कायम ठेवणार
पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना अनेक विकासकामांना निधीची आवश्यक्ता भासत आहे. निधी उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरीदेखील राज्य सरकारकडून निधी मिळाल्या या विकासकामांना बूस्टर मिळू शकणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी शहरातील सर्वच आमदार प्रयत्नशील राहणार आहेत.





