Nagar | ई केवायसी केलीतरच अर्थसहाय्य खात्यावर होणार जमा

नगर, (प्रतिनिधी) – शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापुस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
(दि. २९) सप्टेंबरपर्यंत अर्थसहाय्याच्या रक्कमा शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग होणर आहे. मात्र त्यासाठी शेतकर्यांनी ई केवायसी करणे बंधन कारक आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घेण्याचे आवाहान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ५ हजार (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य अदा करण्याकरीता कापुस उत्पादक शेतक-यांसाठी १ हजार ५४८.३४ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी २६४६.३४ कोटी अशा एकूण ४१९४.६८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यभरातील कापुस, सोयाबीन उत्पादकांना यांचा फायदा होणार आहे. नगर जिल्ह्यात कापुस उत्पादक शेतक-यांसाठी ६८.१२ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी १०७.१२ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ५ हजार व (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य.
सदर शेतक-यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-यांच्या आधार लिंक्ड बैंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणच्या (डीबीटी) माध्यमातुनच अर्थसाहाय्य जमा करण्यात येईल.
कापुस व सोयाबीन अर्थसाहाय्य योजना अंतर्गत ई- केवायसी साठीची सुविधा सीएससी सेंटर, सेतु कार्यालय, आपले सरकार केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.





