मंचर, (प्रतिनिधी) – येथे नगरपंचायत झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या मशिदीसाठी निधी मंजूर केला असून, पुढील काळातही मुस्लिम बांधवांच्या विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंचर शहरात मुस्लिम बांधवांकडून परंपरेनुसार बुधवारी (दि. 17) मोहरमनिमित्त अशुरा साजरा करण्यात आला. अवलिया दर्गा चौकात 34पंजा मिरवणुकीसमोर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, राजेंद्र थोरात, हुसेन ट्रस्टचे अध्यक्ष राहीबर मीर, विश्वस्त राजू इनामदार, अल्लू इनामदार, मीर शरफ, हैदर मिर्झा यांनी इमामे हुसेन यांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त करून मातम केले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले हजरत इमामे हुसेन यांनी दहशतवादाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण दिली. असे सांगून ते म्हणाले, मंचर येथे मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार रौशन मशीदसाठी अद्यावत सभागृह बांधकामासाठी 60 लाख रुपये व अवलिया दर्गा दुरुस्तीसाठी 70 लाख रुपये निधी मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.