बदलापूर प्रकरणातील फरार शाळेच्या ट्रस्टींना अटक

ठाणे – बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या शाळेच्या ट्रस्टींचे नाव आहे. दोन्ही ट्रस्टींना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पोलिसांकडून आता शाळेच्या ट्रस्टींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करणार आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या संस्थाचालक आणि सचिवांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींची याचिका फेटाळली होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
शिवाय न्यायालयाने आरोपींचा शोध घेण्यात तपासयंत्रणेला अपयश येत असल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारला देखील खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज पोलिसांनी कर्जत येथील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.





