Badlapur News: ‘या लोकांचा चौरंग केला पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक

यवतमाळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रा सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे विभागवार दौरे सुरु आहेत. मराठवाड्याचा दौरा संपवून राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर गडचिरोलीनंतर आज ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे त्यांच्या नवनिर्माण यात्रेचे स्वागत करण्यात आले.
राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेत 200-225 जागा लढण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र दौऱ्यात ते उमेदवारांची घोषणा करत आहेत. वणी येथील स्वागत सोहळ्यात राज ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली.
राज ठाकरे म्हणाले की, एवढ्या वर्षांत महाराष्ट्राचे एवढे गढूळ वातावरण झालेल पाहिले नव्हते. निवडणुकीनंतर हे लोकं कोटीने विकली जातात. आज याची सत्ता, उद्या त्याची सत्ता. कोण कुठल्या पक्षात तेही समजत नाही.
या राजकारणाला उत्तर देण्याची वेळ आगामी विधानसभा निवडणूक आहे. त्यामध्ये जर तुम्ही व्यक्त झाले नाही ना, तर कधीही तुमचे प्रश्न सुटणार नाही. बदलापूरची घटना आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी घटना उघड केली, तोपर्यंत दाबून ठेवली होती. आज छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते.
महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हात पाय कापून जसा चौरंग केला, तसा या लोकांचा चौरंग केला पाहिजे. बदलापूरमध्ये जे झाले त्याचे कारण कायद्याचा वचक नाही. याचा दोष पोलिस यंत्रणेला देणार नाही. त्यांच्यावर जो राजकीय दबाव असतो.
यांनी योग्य काम केले तर यांना नोकरीवरुन काढणार. त्यांची चौकशी लावणार. आणि जे लोक दबाव टाकणार त्यांची कोण चौकशी करणार? असा सवाल करत राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीला राज ठाकरेंनी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवले.





