Iran fuel tanker explosion : इराणमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट.! ११ जण ठार तर, ७ जखमी
राजधानी तेहरानपासून पश्चिमेला ४०० किलोमीटर अंतरावरील सानंदाज या कुर्दिश शहरात एका वाहतूक पोलीस चौकीजवळ ही घटना घडली.

Iran fuel tanker explosion – इराणच्या पश्चिमेला इंधनाच्या एका टँकरचा स्फोट होऊन ११ जण ठार झाले आणि ७ जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरून जात असलेल्या इतर काही वाहनांना धडकल्यानंतर या टँकरचा स्फोट झाला आणि नंतर टँकरने पेट घेतला.
राजधानी तेहरानपासून पश्चिमेला ४०० किलोमीटर अंतरावरील सानंदाज या कुर्दिश शहरात एका वाहतूक पोलीस चौकीजवळ ही घटना घडली. टँकरच्या नादुरुस्त ब्रेकमुळे हा अपघात झाल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
२०१८ मध्ये, सनंदाजजवळ इंधन टँकर आणि आंतरशहरी प्रवासी बस यांच्यात झालेल्या अशाच एका रस्ते अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते.
इराणमध्ये दरवर्षी रस्ते आणि वाहतूक अपघातांमध्ये १७,००० हून अधिक लोकांचा मृत्यू होतो. असुरक्षित वाहने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या आपत्कालीन सेवा यांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.





