इंधनाच्या खरेदी – विक्री किमतीतील तफावत वाढली; तेल कंपन्यांना होणार तोटा

नवी दिल्ली – इंधनाची खरेदी किंमत देशांमध्ये विक्री किमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पहिल्या तिमाईमध्ये तेल कंपन्यांचा तोटा वाढणार आहे. पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून कालावधीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना 10,700 कोटी रुपयांचा तोटा होईल अशी आकडेवारी समोर आली आहे.
अजूनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जास्त आहेत. मात्र देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कसलीही वाढ करण्यात आली नसल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीज या संस्थेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
भारतातील 90% पेट्रोल आणि डिझेलचे वितरण इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन करतात. या कंपन्यांना तेल शुद्धीकरणातून नफा वाढला आहे मात्र डिझेल, पेट्रोलविक्री मागे प्रत्येक लिटरला या कंपन्यांना 12 ते 14 रुपयाचा तोटा होत आहे. सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
त्यामध्ये अजून फारशी वाढ झालेली नाही. जर या तेलाच्या किमती आणखी वाढल्या तर तेल कंपन्यांचा तोटा आणखी वाढू शकतो. 2014 मध्ये केंद्र सरकारने तेल कंपन्यांना जागतिक दरवाढीनुसार देशात इंधनाच्या किमती वाढविण्याचा अधिकार दिला आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये सरकारच्या सूचनेनंतरच तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा कपात करीत असतात. निवडणुका आल्यानंतर या कंपन्या दरवाढ करत नाहीत आणि निवडणुका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दरवाढ करतात असे दिसून आले आहे.





