फळ, भाजीपाल्याचे व्यवहार सुरू

पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 50 दिवसांपासून बंद असलेला मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभाग सुरू झाला. मात्र, रविवारच्या तुलनेत केवळ 10 टक्केच आवक झाली. पहिल्या दिवशी मालाल उठाव नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर माल पडून होता.
महात्मा फुले मंडईसह शहरातील काही किरकोळ बाजार बंद आहेत. त्याचा फटका बसत आहे. तर, काही लोक करोनाच्या भीतीमुळे मार्केट यार्डात येण्याचे टाळत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत पुन्हा बाजार जोरात सुरू होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात एकदिवसाआड निम्म्या व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. आज 400 व्यापाऱ्यांना परवानगी होती. एक व्यापारी, एक वाहन या तत्त्वानुसार 400 वाहने बाजारात येणे अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात 200 वाहनेच बाजारात आली. या वाहनातून 11 हजार क्विंटल शेतीमाल बाजारात आल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘बाजार सुरू झाल्याचे अद्याप अनेकांना माहिती नसण्याची शक्यता आहे. परराज्य, परजिल्ह्यांतील खरेदीदार येण्यास काही दिवसांत सुरूवात येईल. त्यानुसार लवकर पूर्वीप्रमाणे बाजार सुरळीतपणे सुरू होईल. दरम्यान, मांजरी उपबाजारात 200 गाड्यांतून 1100 क्विंटल, मोशी-135 गाड्यांतून 2 हजार 881 क्विंटल आणि उत्तमनगर उपबाजारात 16 गाड्यांतून 60 क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
बाजारात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी सुरू असून, सॅनिटाइझ करण्यात येत आहे. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. आता दैनंदिन बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे पुणेकारांची भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याची गरज भागणार आहे.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.





