कराड पालिकेसाठी आघाड्यांची ‘फिल्डींग’; इच्छुकांच्या जोर बैठका

संजय पाटील / कराड : कराड पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2017 मध्ये भाजप वगळता अन्य आघाड्यांचे राजकारण शहराने पाहिले असून आत्ताही विविध आघाड्यांमधील गटतट व इच्छुक उमेदवारांच्या जोर बैठका सुरू आहेत.
‘किंगमेकर’ म्हणून आपलीच आघाडी समोर यावी, यासाठी मजबूत संघटना बांधणीवर भर दिला जात आहे. मात्र, भाजपही आपले हातचे राखून आहे. त्यामुळे येणार्या काळात प्रचंड मोठ्या उलाढाली कराड पालिकेच्या राजकारणात होणार, हे निश्चित.
कराड पालिकेमध्ये उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघाचा प्रभाव नेहमीच पहावयास मिळाला आहे. या दोन्हीकडील आमदारांनी पालिकेचे राजकारण केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाने बहुसंख्य नगरसेवक पालिकेला दिले.
मात्र सात ते आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिणमध्ये आमदार डॉ. अतुल भोसले व उत्तरमधून मनोज घोरपडे या दोन्हीही भाजपच्या आमदारांनी बाजी मारली. या दोघांचेही पालिकेवर लक्ष राहणार आहे. काही करून भाजपचे कमळ पालिकेवर फुलवायचेच, हा अट्टाहास भाजपच्या वरिष्ठांचा फार आधीपासून राहिला आहे.
गत निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही कमळावरच निवडणूक लढवून ती जिंकायची असे प्रयत्न वरिष्ठांचे आहेत. हे ध्यानात ठेवूनच इतर आघाडीच्या नेत्यांनी आपापली ‘फिल्डिंग’ लावून आपणच कसे ‘किंगमेकर’ होर्ऊें यासाठी प्रयत्न केले आहेत.
‘किंगमेकर’ होण्यासाठी धडपड
1) कराड पालिकेत जनशक्ती आघाडी, लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि जनसेवा विकास आघाडी यासारख्या आघाड्यांचे राजकारण यापुर्वी पहायला मिळाले आहे.
2) या आघाड्यांतील प्रमुख नेत्यांसह दुसर्या फळीतील पदाधिकारी येणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करत असून त्या निवडणुकीत आपली आघाडी ‘किंगमेकर’ कशी ठरेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
3) पालिकेची राजकारणातील सद्यस्थिती पाहता कोणताही एकटा पक्ष किंवा आघाडी पूर्ण बहुमताने पालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
4) बहुमताने वर्चस्व सिद्ध करता येणार नसल्याची पुरेपूर शक्यता गृहीत धरून सर्व आघाड्यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.
भावी नगराध्यक्ष चांगलेच ‘चार्ज’
वीस वर्षांपेक्षा अधिक काळ कराड पालिकेत सर्वसाधारण आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे यंदा पालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण पडेल, ही शक्यता गृहीत धरून अनेक आघाड्यांच्या प्रमुखांनी आपापल्या पद्धतीने छुपा तर कधी जाहीर प्रचार सुरू केला आहे. यंदाही थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया होणार असल्याने आपला खुट्टा मजबूत करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
आघाड्यातील नेत्यांना कमळाचा लळा
केंद्रात व राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे त्यातच कराड दक्षिणमध्येही अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपचे आमदार कार्यरत आहेत. त्यामुळे कराड पालिकेत भाजपचे पारडे काहीसे जड आहे, असे वाटू लागल्याने आघाडीतील काही माजी नगरसेवकांसह दुसर्या फळीतील पदाधिकार्यांना कमळाचा लळा लागला आहे. आपणही कमळ हातात घ्यावे आणि ते अभिमानाने नगरपालिकेत मिरवावे, असे स्वप्न या माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकार्यांना पडत आहे. मात्र, भाजपकडून या नेत्यांना कसा प्रतिसाद दिला जातो, हे येणार्या काळातच कळेलच.





