Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रिपद…! छगन भुजबळांची असामान्य राजकीय घौडदौड!

Chhagan Bhujbal Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं असून ते आज (20 मे) राजभवनात सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागी भुजबळ यांची निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या रिक्तपदी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.
भाजीविक्रेता, नगरसेवक ते मंत्री?
छगन भुजबळ यांनी १९६० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे.
त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.१९७३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. १९७३ ते १९८४ या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर १९८५ मध्ये महापौर झाले.
विधानसभेवर भुजबळ १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री तसेच एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अशी त्यांची तेव्हा कारकीर्द होती. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली.
एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन मंत्रालयांचा कारभार त्यांनी बघितला. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री, तर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.
२००९ मध्ये दुसऱ्यांदा, तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
तसेच महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
दरम्यान भुजबळ यांनी राजकीय कारकीर्दीत आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेत देखील ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत.
विविध संस्थांवर काम
छगन भुजबळ यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम केले आहे. तसेच वांद्रे – मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची देखील स्थापना केली आहे.





