Top 10 News : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी राडा ते PF खातेदारांसाठी मोठी बातमी..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या..
Top 10 News : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी राडा ते PF खातेदारांसाठी मोठी बातमी..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या..

Top 10 News : १) काळे झेंडे अन् जोरदार घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलक आक्रमक
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सभेच्या ठिकाणाबाहेर आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होताच काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने पोलिसांची धावपळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ५० हून अधिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना परभणीत शिंदे यांची सभा झाली. त्यामुळे या घटनेला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झालेय. (Top 10 News)
२) सेफ्टी बेल्ट तुटला अन् चिमुकला सातव्या थरावरून खाली कोसळला; बदलापुरातील घटना
बदलापूरमध्ये ‘माखन चोर दही काला उत्सवा’दरम्यान थरारक घटना घडलीय. चोरहंडी फोडण्यासाठी प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदांनी सात थरांची सलामी दिली. सातव्या थरावर चिमुकला असताना अचानक सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो थेट खाली कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि गोविंदांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चिमुकला खाली कोसळताच त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. शिवसेना युवा सेना शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या आयोजनातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीमध्ये उंच थर रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, सातव्या थराला सलामी दिल्यानंतरच सेफ्टी बेल्ट तुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Top 10 News)
३) ‘ओम्या’ शर्यतीचा राजा गेला! ७ थार, २ स्कॉर्पिओ, ३ जेसीबी, ८ ट्रॅक्टर जिंकून मालकाला केलं मालामाल
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचा ‘राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम्या बैलाचे निधन झालेय. २७ ऑगस्ट २०२६ रोजी ओम्याचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातून आणलेल्या ओम्याने २०१७ पासून बैलगाडा शर्यतीच्या घाटात आपला दबदबा निर्माण केला होता. तब्बल १२०० गाड्यांमधून पहिला क्रमांक मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. ओम्याने आपल्या मालकाला सहा-सात थार, दोन स्कॉर्पिओ, तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, असंख्य दुचाकी, चांदीची गदा आणि अनेक ट्रॉफी अशी बक्षिसे जिंकून दिली. त्याची विशेष काळजी घेत पौष्टिक आहार दिला जात होता. दरम्यान, अचानक प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी विषारी दंशामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. ओम्याच्या निधनाने मालक रामनाथ वारंगे यांच्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Top 10 News)
४) भारतात एकही मुस्लीम नको’ म्हणणारा हिंदूच नाही : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ परिषदेत हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम समाजाच्या स्थानाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलंय. भारतात एकही मुस्लीम नको, असं एखाद्या हिंदूला वाटत असेल, तर तो हिंदूच नाही, असे भागवत म्हणाले. हिंदू विचारसरणीमध्ये विविध मार्गांचा स्वीकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. सत्य एकच असले तरी ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आणि समजून घेतले जाते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा असून मानवता मूलतः एकच आहे, असा संदेशही त्यांनी दिला. (Top 10 News)
५) अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या CPT इंटर्नशिप नियमांवर ट्रम्प प्रशासनाने कठोर भूमिका घेतलीय. २४ ऑगस्टला स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्रामने विद्यापीठांना नवीन ज्ञापन पाठवून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. काही विद्यापीठांकडून अभ्यासक्रमाशी पुरेसा संबंध नसलेल्या CPTला मंजुरी दिली जात असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यानंतर काही विद्यापीठांनी CPT अर्जांच्या प्रक्रियेवर तात्पुरती मर्यादा आणलीय. मात्र, सरकारने नियम बदलले नसून त्यांच्या अंमलबजावणीवर अधिक भर दिला जात असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही याचा परिणाम जाणवू शकतो. विशेषतः अभ्यासक्रमाशी संबंधित इंटर्नशिपसाठी अतिरिक्त तपासणी, कागदपत्रे किंवा प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
६) PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 मध्ये UPI-ATMसह होणार ५ मोठे बदल
EPFO 3.0 अंतर्गत पीएफ खातेदारांसाठी अनेक डिजिटल बदल करण्यात येत आहेत. यामुळे पीएफशी संबंधित सेवा अधिक जलद आणि सोप्या होण्याची शक्यता आहे. पात्रतेनुसार UPI आणि UPI-सक्षम ATMद्वारे PFची रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. तसेच ऑटो-सेटलमेंटची मर्यादा १ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आलीय. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घराशी संबंधित पात्र कारणांसाठी क्लेम जलद निकाली काढण्यास मदत होणार आहे. UMANG अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशनमुळे UAN अॅक्टिव्हेशन, पासबुक आणि ऑनलाइन क्लेमची प्रक्रिया अधिक सोपी होईल. नव्या डिजिटल व्यवस्थेत पात्र रक्कम आधीच समजल्याने चुकीचे क्लेम कमी होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त माहितीची गरज भासल्यास ऑनलाइन स्पष्टीकरण देण्याची सुविधाही मिळणार आहे. दरम्यान, FY26 साठी EPF आणि VPF वर ८.२५% व्याजदर मंजूर करण्यात आला आहे.
७) Bajaj Pulsar चं नवं मॉडेल 24 ऑगस्टला होणार लाँच
बजाज ऑटो कंपनी आपल्या लोकप्रिय Pulsar सिरीजमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन जनरेशनच्या Pulsar 125 आणि Pulsar 150 बाईक्स भारतात लाँच करू शकते. नवीन मॉडेल्समध्ये डिझाइनसोबतच प्लॅटफॉर्म, चेसिस, इंजिन आणि टेक्नॉलॉजीमध्येही मोठे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. नव्या पल्सरमध्ये मोठे हेडलॅम्प कव्हर, मस्क्युलर फ्युएल टँक आणि स्लिम टेल सेक्शन देण्यात येऊ शकते. दोन्ही बाईक्स नवीन फ्रेमवर आधारित असण्याची शक्यता असून, पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे मोनोशॉक मिळू शकतो. ब्रेकिंगसाठी डिस्क आणि ड्रम सेटअपसह सिंगल-चॅनल ABS अपेक्षित आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये कलर TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
८) Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त; 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी
Samsung Galaxy A35 5G खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर समोर आलीय. लाँचच्या वेळी ३२,९९९ रुपयांपासून उपलब्ध असलेला या फोनचा ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर १८,९९९ रुपयांना मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. म्हणजेच लाँच किमतीच्या तुलनेत तब्बल १२ हजार रुपयांची कपात झालीय. याशिवाय पात्र बँक कार्डवर अतिरिक्त सवलत आणि जुन्या फोनवर एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा १२०Hz AMOLED डिस्प्ले, ५,०००mAh बॅटरी आणि ४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलाय. फोटोग्राफीसाठी ५०MP मुख्य कॅमेरा, ८MP अल्ट्रा-वाइड आणि ५MP मॅक्रो कॅमेरा मिळतो, तर सेल्फीसाठी १२MP फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे या किमतीत Samsung चा 5G फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही डील आकर्षक ठरू शकते. (Top 10 News)
९) ‘फँड्री’ची शालू पुन्हा चर्चेत; हिरव्या साडीतील लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
मराठी चित्रपट ‘फँड्री’मधील शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आलीय. सोशल मीडियावर तिने नुकतेच साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले असून, तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेय. राजेश्वरीने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग केशरी रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय. नदीच्या किनारी तसेच नदीच्या पाण्यात उतरून तिने हे खास फोटोशूट केल्याचे दिसत आहे. तिचा पारंपरिक आणि आकर्षक अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. राजेश्वरीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी लव्ह इमोजी शेअर करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केलेय. ‘फँड्री’नंतर राजेश्वरीने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी सोशल मीडियावर ती सातत्याने सक्रिय असते. (Top 10 News)
१ ० ) जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीची काउंटीत एन्ट्री; न्यूझीलंड दौऱ्याची तयारी सुरू!
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ‘सरे’ क्लबकडून आगामी तीन सामने खेळणार आहे. वर्क व्हिसा मिळाल्यानंतर तो लंडनला रवाना झाला असून ‘द ओव्हल’वर पदार्पण करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमधील भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून याकडे पाहिले जात आहे. यंदाच्या रणजी हंगामात ६० विकेट्स घेत जेतेपद मिळवून देणाऱ्या आकिबला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ८.४ कोटींना करारबद्ध केले होते. २२ सप्टेंबरच्या भारत ‘ए’ मालिकेपूर्वी तो मायदेशी परतेल. (Top 10 News)





