बीड : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राजकारणाला दुय्यम ठरवत “हिंदू धर्म रक्षक” बनण्याचा निर्धार जाहीर केला. हिंदू संस्कृतीच जगाला वाचवू शकते. राजकारण दुय्यम आहे, आता धर्माचं काम करायचंय, असे सणसणीत वक्तव्य त्यांनी केलं. अहिल्यानगर नावाचा आग्रह, मुघलकालीन गावांची नावं बदलण्याची मागणी, अतिक्रमणावर बुलडोझर आणि बीड तुरुंगातील कथित धर्मांतर रॅकेटवरून त्यांनी सरकारला आणि विरोधकांना धारेवर धरलं. डिसेंबरच्या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. कपाळावर अहिल्यानगर लिहा, मुघल नावं पुसा गोपीचंद पडळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या सरकारचं कौतुक केलं. विरोधक बारक्या मुलांसारखं रडतात. कायद्याच्या देशात अहिल्यानगर का बोलणार नाही? कपाळावरही अहिल्यानगर लिहावं लागेल, मुलांच्या दाखल्यावरही हे नाव येईल, असं ते म्हणाले. मुघलकालीन नावं हटवण्याची मागणी करताना त्यांनी बीडमधील जहांगीर मोहा गावाचं उदाहरण दिलं. मुघलांचे वारस असलेली गावांची नावं बदलली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दणक्यात नावं बदलणार, असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं. बुलडोझर फिरवा, मटण शॉप हटवा शहरातील अतिक्रमणावर पडळकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. कलेक्टर ऑफिसबाहेर अतिक्रमण आहे, ते हटवा. अहिल्यानगर रोडवरील थडगे काढा. नदीतील अतिक्रमणावर कारवाई करा. ही तुमच्या बापाची मालमत्ता नाही. मंदिरासमोर मटण शॉप चालणार नाही, देवाची विटंबना खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी जिहादी चुकीच्या पद्धतीचा उल्लेख करत हिंदू मुलींवर होणाऱ्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं, हे षड्यंत्र आहे. धार्मिक स्थळांवर छेडछाड वाढली. तिथे पोलिस चौकी उभारावी, असं त्यांनी सुचवलं. बुलडोझरच्या कारवाईचा इशारा देत ते म्हणाले, सरकारी जागेवर अतिक्रमण खपवणार नाही. बीड तुरुंगातील धर्मांतर रॅकेट पडळकरांनी बीड तुरुंगातील जेलर पेट्रस गायकवाडवर गंभीर आरोप केले. गायकवाड धर्मांतराचं रॅकेट चालवतो. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे फोटो काढले, जेलच्या प्रवेशद्वारावर बायबलचं स्लॉगन लावलं, कीर्तन बंद केलं. कैद्यांना धर्मांतरासाठी आमिष दाखवली जात आहेत. संजय गायकवाड नावाचा पादरी तिथे ३ तास बसतो. हे स्वीट पॉयझन आहे, असं ते म्हणाले. त्यांनी जेलरवर गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी केली. देसाई नावाचा अधिकारी याला पाठीशी घालतो. मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, तत्काळ कारवाई करा, असं आवाहन त्यांनी केलं. सरकारमधील नेते खमक्या आहेत, देवा भाऊ हिंदू रक्षणासाठी खंबीर आहेत. गो-हत्या बंदीचा कायदा आणलाय, सरकार आपलं काम करतंय, असं ते म्हणाले.