Ranveer Singh: “कंटेंट रायटर ते बॉलिवूडचा सुपरस्टार! रणवीर सिंहच्या यशामागची प्रेरणादायी कहाणी”
Ranveer Singh रणवीर सिंहला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपट पाहणे, कलाकारांची नक्कल करणे आणि शाळेतील नाटकांमध्ये भाग घेणे हा त्याचा आवडता छंद होता.

Ranveer Singh: बॉलिवूडमधील सर्वात ऊर्जा, उत्साह आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह आज ४१ वर्षांचा झाला आहे. आपल्या वेगळ्या अभिनयशैली, हटके फॅशन सेन्स आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करण्याच्या स्वभावामुळे रणवीरने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, हा यशाचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. कंटेंट रायटर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या रणवीरने मेहनत, जिद्द आणि अभिनयावरील प्रेमाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून स्थान मिळवले.
रणवीर सिंहला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपट पाहणे, कलाकारांची नक्कल करणे आणि शाळेतील नाटकांमध्ये भाग घेणे हा त्याचा आवडता छंद होता. अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी त्याने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. मात्र, अभिनयात संधी मिळेपर्यंत त्याने एका जाहिरात संस्थेत कंटेंट रायटर म्हणून काम केले. नोकरी करत असतानाही अभिनेता होण्याचे स्वप्न त्याने कधीच सोडले नाही.
रणवीरच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा आजही चर्चेत असतो. शाळेत असताना तो वर्गात बसून शाहरुख खानच्या ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैयाँ छैयाँ’ हे गाणे ऐकत होता. यामुळे शाळेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने त्याच्यावर कारवाई झाली आणि त्याला काही काळासाठी निलंबित करण्यात आले. चित्रपटांबद्दलचे त्याचे वेड त्या घटनेतूनही दिसून येते.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी रणवीरने दोन चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. त्या चित्रपटांच्या कथा त्याला पसंत न पडल्याने त्याने हा निर्णय घेतला. योग्य संधीची वाट पाहत असताना त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या. जवळपास दोन आठवड्यांच्या कठीण ऑडिशन प्रक्रियेनंतर त्याची ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत निवड झाली. ‘बिट्टू शर्मा’ या भूमिकेने रणवीरला एका रात्रीत लोकप्रियता मिळवून दिली आणि त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली.

Ranveer Singh
यानंतर रणवीरने मागे वळून पाहिले नाही. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’, ‘सिंबा’ आणि ‘८३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. प्रत्येक भूमिकेसाठी तो घेत असलेली मेहनत आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होण्याची त्याची शैली प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे.
यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे रणवीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठे कौतुक झाले. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने रणवीरच्या कारकिर्दीला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
रणवीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २०१८ मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत विवाह केला. हे दोघे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या घरी मुलगी ‘दुआ’चे आगमन झाले. कुटुंबासोबतचा वेळही रणवीर तितक्याच आनंदाने घालवत असल्याचे अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते.
रणवीर सिंहचा प्रवास हा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. साध्या नोकरीपासून सुरुवात करून स्वतःच्या मेहनतीच्या बळावर त्याने बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. अभिनयावरील निष्ठा, सातत्य, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत असेल तर यश नक्की मिळू शकते, हे रणवीरने आपल्या प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच आज तो केवळ लोकप्रिय अभिनेता नाही, तर मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो.





