World Bicycle Day: लग्नातील मानाचा आहेर ते फिटनेसचा साथीदार; सायकलचा प्रेरणादायी प्रवास
World Bicycle Day संयुक्त राष्ट्र महासभेने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून घोषित केला. सायकलचा शोध १८व्या शतकात लागला. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तिच्यात अनेक बदल झाले. आज बाजारात रोड बाईक, माउंटन बाईक, फोल्डिंग बाईक, टूरिंग बाईक आणि इतर आधुनिक प्रकार उपलब्ध आहेत.

World Bicycle Day: ३ जून रोजी जगभरात ‘जागतिक सायकल दिन’ साजरा केला जातो. सायकल केवळ प्रवासाचे साधन नसून आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेला महत्त्वाचा घटक आहे. बदलत्या काळानुसार वाहतुकीची अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाली असली तरी सायकलचे महत्त्व आजही कायम आहे.
एकेकाळी सायकल असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. अनेक भागांमध्ये लग्नात सायकल हा मानाचा आहेर म्हणून दिला जात असे. एखाद्या व्यक्तीने नवीन सायकल घेतली की गावातील लोक ती पाहण्यासाठी येत असत. त्या काळात सायकल ही सर्वसामान्यांसाठी मोठी संपत्ती मानली जात होती.
संयुक्त राष्ट्र महासभेने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून घोषित केला. सायकलचा शोध १८व्या शतकात लागला. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तिच्यात अनेक बदल झाले. आज बाजारात रोड बाईक, माउंटन बाईक, फोल्डिंग बाईक, टूरिंग बाईक आणि इतर आधुनिक प्रकार उपलब्ध आहेत.
भारतातही सायकलचा इतिहास खूप समृद्ध आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत सायकल हे देशातील सर्वात लोकप्रिय वाहतूक साधन होते. शेतकरी आपल्या मालाची वाहतूक सायकलवरून करत असत. दूध विक्रेते, पोस्टमन आणि कारखान्यातील कामगार यांच्यासाठी सायकल हेच मुख्य साधन होते. कमी खर्च आणि सोपी देखभाल यामुळे सायकलने देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Bicycle day
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एकेकाळी सायकल चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागत असे. तसेच सायकलवर करही आकारला जात होता. नंतर नागरिकांच्या मागणीनंतर हा कर रद्द करण्यात आला. त्या काळात शहरात हजारो सायकली नोंदणीकृत होत्या.
आज सायकलचा वापर केवळ प्रवासापुरता मर्यादित राहिलेला नाही. फिटनेससाठी सायकलिंग हा लोकप्रिय पर्याय बनला आहे. नियमित सायकल चालवल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होतात आणि वजन नियंत्रणात राहते. सायकलिंगमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि शरीर अधिक सक्रिय राहते.
तज्ज्ञांच्या मते, नियमित सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यालाही फायदा होतो. ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत मिळते. सायकल चालवताना लक्ष केंद्रित करावे लागते, त्यामुळे एकाग्रताही वाढते. याशिवाय रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्यास आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यासही सायकलिंग उपयुक्त ठरू शकते.
पर्यावरण संरक्षणासाठीही सायकल महत्त्वाची भूमिका बजावते. सायकल चालवताना कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे वाढत्या वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश सायकल वापराला प्रोत्साहन देत आहेत. नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये सायकलसाठी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतातील अनेक शहरांमध्येही सायकल ट्रॅक विकसित केले जात आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात सायकल ही केवळ जुन्या आठवणींचा भाग नसून निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा आधार बनली आहे. फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचत या तिन्ही गोष्टींसाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल वापरण्याची सवय लावणे ही काळाची गरज ठरत आहे.





