बर्लिन – जर्मनीत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते फेड्रीक मर्झ हे संसदेत झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या पेरीमध्ये विजयी झाले आणि देशाचे चॅन्सेलर म्हणून निवडून आले. जर्मनीच्या चॅन्सेलरची निवड पहिल्यांदाच दुसऱ्या फेरीमध्ये झाल्यामुळे मर्झ यांच्या निवडीनंतर संसदेतल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलासा मिळाला. एकूण चार फेऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया लांबवली जाण्याची तरतूद आहे. तेवढा काळ ही प्रक्रिया लांबवली गेली नाही, याचाही अनेकांना आनंद झाला. मर्झ यांचा पहिल्या पेरीमध्ये पराभव झाल्यामुळे एका दृष्टीने राजकीय अनिश्चिततेचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे जर्मनीतल्या शेअर बाजारात १.८ टक्क्यांची घसरण देखील झाली. युरोपीय संघातील प्रमुख देश असलेल्या जर्मनीत मर्झ यांच्या निवडीमुळे अनेक महत्वाच्या धोरणांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. विशेषतः ट्रम्प यांच्या व्यापार विषयक धोरणाला विरोध केला जाईल, आणि रशिया-युक्रेन युद्धामध्ये सकारात्मक भूमिका बजावली जाईल, असे वाटत असतानाच मर्झ यांचा पहिल्या फेरीत पराभव झाल्यामुळे युरोपातल्या धोरणकर्त्यांना धक्का बसला होता. आता जरी मर्झ यांचा विजय झाला असला तरी त्यांचे सरकार कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पहिल्या फेरीमध्ये गुप्त मतदान झाल्यामुळे मर्झ यांच्या बाजूच्या कोणी त्यांच्या विरोधात मतदान केले होते, हे समजू शकणार नाही. मर्झ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये त्यांच्या मध्य-उजव्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि त्यांच्या बव्हेरियन भगिनी पक्ष, ख्रिश्चन सोशल युनियन पक्ष आहेत.