शिधावाटपात वारंवार नेटवर्कची बाधा

पुरंदर तालुक्यात सर्वसामान्यांना प्रतीक्षा
वाल्हे – पुरदंर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ई- पॉस मशिनला इंटरनेटचे संपर्क क्षेत्र मिळत नसल्यामुळे शिधा वाटपात, तसेच ऑक्टोबर महिन्यातील रेशनिंग वाटपात अडथळा येत आहे.
पुरंदर तालुक्यातील रेशनिंग दुकानात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतू दोन वर्षांपासून बहुतांश नागरिकांना अन्नधान्य मोफत व कमी दरामध्ये रेशन दुकानांमध्ये उपलबध करून दिले जात आहे. त्यातच राज्य सरकारने गरीबांची दिवाळी आनंदाची जावी, यासाठी 100 रुपयांमध्ये खाद्यतेल, रवा, हरभरा डाळ, साखर या चार वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने योजनेला आनंदाचा शिधा, असे नाव दिले आहे.
दिवाळी सणाला सुरुवात होऊन, तीन दिवसांनी तो शिधा अद्यापपर्यंत तालुक्यातील काही गावांत रेशन दुकानदारांपर्यंत (दि.23) सायंकाळी सहापर्यंत तरी पोहोचला नव्हता. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील रेशनिंग वाटप काही ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. वाटपात नेटवर्कचा अडथळा येत आहे. सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीत रेशनिंग व शासनाने घोषित केलेला आनंदाचा शिधा मिळत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य संताप व्यक्त करीत आहेत.





