French Open badminton | पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

पॅरिस – भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूचे शनिवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूला जपानच्या सयाका ताकाहाशीकडून पराभव पत्कारावा लागला.
2013 आणि 2014च्या आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या सयाका ताकाहाशीने सिंधूवर 21-18, 16-21, 12-21 असा विजय मिळविला. 29 वर्षीय जपानी खेळाडूंकडून सिंधूचा हा चौथा पराभव ठरला. तसेच सिंधूला गतआठवड्यात ओडेन्स येथे डेन्मार्क ओपनमध्येही उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने सामन्याची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली. या उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी लहान रॅली खेळल्या आणि आक्रमक फटक्यांद्वारे एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सेटमध्ये 5-5 ते 9-9 अशी बरोबरी साधल्यानंतर ताकाहाशीने एक शक्तिशाली स्मॅश मारला जो सिंधूच्या गालावर आदळला आणि 10-9 अशी आघाडी घेतली. परंतु भारतीय खेळाडूने क्रॉस कोर्ट स्मॅशसह बरोबरी साधली. यानंतर सिंधूने 21-18 असा पहिला सेट जिंकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये ताकाहाशीने सिंधुच्या कमकुवत बॅकहॅंडचा फायदा घेतला. यानंतर सिंधूला कामगिरीत सुधारणा न करण्यात आल्याने सामना गमवावा लागला.
दरम्यान, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने आठव्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानवर 21-14, 21-14 अशी सरळ गेममध्ये मात केली होती. बुसाननविरुद्ध सिंधूचा हा 15 सामन्यांत 14 वा विजय ठरला होता. त्याआधी तिने डेन्मार्कच्या लिन ख्रिस्तोफरसनला 21-19, 21-9 असे पराभूत केले होते.





