Babaji Kale : 8 दिवसाला एक घोटाळा बाहेर काढणार; आमदार काळेंचे माजी आमदार मोहितेंना चॅलेंज

राजगुरूनगर : खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सणसणीत पलटवार करत गंभीर आरोप केले. “पराभवामुळे मोहितेंची झोप उडाली आहे. ते पोटनिवडणुकीची स्वप्ने पाहत आहेत. एमआयडीसी आणि पुनर्वसनात त्यांनी जमिनी लाटल्या, याचे पुरावे आहेत. मी दर आठवड्याला त्यांचा एक घोटाळा उघड करेन,” असे आव्हान काळे यांनी दिले.
मोहिते पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काळे यांच्यावर निवडणूक खर्चासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगत खेड तालुक्यात पोटनिवडणूक होईल, असा दावा केला होता. गुरुवारी (दि. ०५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजगुरूनगर नगरपरिषदेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित होते. मोहिते यांनी भाषण करून निघून गेल्यानंतर काळे यांनी उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांच्यावर जोरदार टीका केली.
काळे म्हणाले, “मला माऊलीचा आशीर्वाद आणि जनतेचा पाठिंबा आहे, म्हणून मी निवडून आलो. मोहिते यांना माझ्या विजयाने अस्वस्थता आहे. त्यांनी एमआयडीसी आणि पुनर्वसनात पत्नी, पुतण्या आणि भावाच्या नावे २५ एकर जमीन खरेदी केली, तर स्थानिकांचे पुनर्वसन अजूनही प्रलंबित आहे. त्यांचे सरकारी हप्ते बंद झाले, लोक त्यांच्याकडे जात नाहीत, म्हणून ते वैतागले आहेत.”
टक्केवारी घेऊन शहराचे वाटोळे
काळे पुढे म्हणाले कि, मोहिते यांनी राजगुरूनगरचा विकास शून्य टक्के केला. “खेड शहराचे वाटोळे करत टक्केवारी घेऊन कामे केली. त्यांना पाहिल्यावर माझी तळपायाची आग मस्तकात जाते,” अशी खालच्या पातळीवरील टीका काळे यांनी केली.





