French Open 2024 : सबालेन्का आणि रायबाकिनाची आगेकूच कायम…

French Open 2024 :- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटात अरिना सबालेन्का व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनी विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली. महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सबालेन्काने अमेरिकेच्या एमा नवारोवर ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सबालेन्काने नवारोला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. तर, चौथ्या मानांकित रायबाकिनाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-४, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. १२व्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीने एलिना अवानेस्यानचा ४-६, ६-०, ६-१ असा पराभव केला.
बोपण्णा-एब्डेन जोडीची आगेकूच
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन जोडीने पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात भारताचा एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल रेयास-वरेला जोडीवर ६-७ (२-७), ६-३, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा-एब्डेन जोडीने पुनरागमन करताना विजयाची नोंद केली.





