फ्रेंच ओपन टेनिस : गारठलेली अझारेन्का अखेर दुसऱ्या फेरीत

पॅरिस – बेलारूसची टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेन्का हिने अखेर दुसरी फेरी गाठली. फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात तिने कडाक्याच्या थंडीचा मुकाबला तर मॉंन्टेनेग्रोच्या डॅन्का कोव्हिनीक हिचा 6-1, 6-2 असा पराभव केला.
हा सामना सुरू झाला तेव्हा येथील वातावरण सुखद होते. मात्र, काही वेळातच थंडीचा जोर वाढू लागला व अझारेन्काला खेळणे शक्य होत नव्हते. ती पूर्णपणे गारठली होती. तिने रेफ्रींशी हुज्जतही घातली व पहिल्या सेटमध्ये 2-1 अशी आघाडीवर असूनही तिने पुढे खेळण्यास नकार दिला. रेफ्रींनीही चर्चा केली व दोन्ही खेळाडूंना काही वेळाची विश्रांती दिली.
हवेतील गारवा कमी झाल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला व अझारेन्काने थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जॅकेट परिधान करूनच सामना खेळला व विजयासह दुसरी फेरी गाठली. एक तास व काही मिनिटे चाललेल्या या सामन्यात अझारेन्का वारंवार कुडकुडत असल्याचे दिसत होते.
येथील वातावरणाची सवय नव्हती त्यामुळे मला खेळणे शक्य होत नव्हते, असे अझारेन्काने सांगितले. दुसऱ्या फेरीत तिचा सामना सेरेना विल्यम्स व ऍना शेमीदेल्कोव्हा यांच्यातील विजेतीशी होणार आहे.





