पुणे | शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि नगरपरिषदेच्या हद्दीतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना आतापर्यंत 95 टक्के पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून सुमारे 17 लाख 99 हजार 573 इतक्या पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत 16 लाख 97 हजार 603 इतक्या पुस्तकांची मागणी पूर्ण करून त्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत 94.33 टक्के पुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात हवेली, खेड, शिरूर आणि दौंड, बारामती तालुक्यात सर्वाधिक पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालभारतीकडून पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
तालुकास्तरावरून त्या-त्या तालुक्यातील शाळांमधून माध्यमनिहाय पुस्तकांची मागणी बालभारतीच्या ई-बालभारती या संकेतस्थळावर नोंदविण्यात आली होती. त्यानुसार, पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात येते आणि वितरित केले जाते, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.





