घरकुलांना मोफत वाळू दिली जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

श्रीरामपूर – नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना 600 रुपये ब्रास दराने वाळू विक्री सुरु झाली आहे. राज्यातील पहिले वाळू विक्री केंद्र श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरु करण्यात आले असून, या केंद्राचा आढावा सोमवारी (दि.15) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरांना मोफत वाळू देणार असल्याची घोषणा केली. नायगाव डेपोतून आत्तापर्यंत 237 ब्रास वाळू आवास योजनेतील घरांना मोफत दिल्याचेही ते म्हणाले.
विखे म्हणाले, राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.
विखे म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार ब्रॉस वाळू उपलब्ध झाली असून आतापर्यत 237 ब्रॉस वाळू घरकुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरूवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीने नवा विषय होता. परंतू आता सर्व अडथळे दूर झाले आहेत.
विखे म्हणाले की, नागरीकांचा धोरणाला विरोध नाही. यापुर्वी वाळू माफीयांकडून गावाला त्रास झाला. या व्यवसायाने गुन्हेगारी वाढली. तो पुन्हा नको ही त्यांची भावना आहे. जनतेच्या भावनेच्या विरोधात जावून शासन काही करणार नाही. परंतू अमळनेर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेपही झाला.
हे सुध्दा दुर्लक्षित करता येणार नाही. या ग्रामस्थांशी मी स्वतः जावून चर्चा करणार असल्याचे नमूद करून इथे वाळू केंद्र झाले नाहीतर या भागातील इतर नागरिकांना अधिक दूरवरून वाळू आणावी लागेल. त्यांचा वाहतूक खर्चही वाढेल, ही दुसरी बाजू सुध्दा विचारात घेण्याची गरज मंत्र्यांनी बोलून दाखविली.





