पुणे जिल्हा | जाधववाडीत बिबट्यांचा मुक्त संचार

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे एक नव्हे, दोन नव्हे तर चार बिबट्यांंचा मुक्त संचार सुरू असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. जाधववाडी येथील शेतकरी सुमित बाळू टेमगिरे यांच्या घरासमोरील पटांगणात एकाच वेळी चार बिबट्यांचे कुटुंबच फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाधववाडी येथे सुमित बाळू टेमगिरे हे शेतकरी राहत असून बुधवार, दि. २४ रोजी पहाटेच्या सुमारात शिकारीच्या शोधात त्यांच्या घरासमोरील परिसरात चार बिबटे फिरताना दिसत असून टेमगिरे यांच्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्नही बिबट्यांनी केला आहे. यातील तीन बिबटे हे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असून एक बिबट्या हा रस्त्याच्या कडेला उभा आहे.
तर दोन बिबटे हे कुत्र्याची शिकार करण्यासाठी पुढे आलेले दिसत आहेत. कुत्रा पिंजऱ्यात बांधून ठेवलेला असल्याने बिबट्यांना कुत्र्याची शिकार करता न आल्याने ते निघून गेले आहेत. या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून बिबट्यांचे पूर्ण कुटुंबच फिरताना दिसत आहे. टेमगिरे यांची तीन कुत्री अगोदरही बिबट्याने मारली असून या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.
आठ दिवसापूर्वी बुधवार दि. १७ रोजी याच रस्त्याने मांजरवाडीवरून बाजार करून दुचाकीवर घरी जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेतल्याची घटना घडली होती. सुदैवाने दुचाकी पुढे गेली व बिबट्याची झेप दुसरीकडे पडल्याने हे दाम्पत्य वाचले. मात्र, या रस्त्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. शेतकरी सुमित टेमगिरे यांनी याबाबत वनविभागाला कळवले.
हद्दीवरून वाद…
मात्र, जाधववाडी हे गाव आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असल्याने आंबेगाव तालुक्यातील वनाधिकारी हे प्रकरण जुन्नर तालुक्याच्या हद्दीत येते. तर जुन्नरचे वनाधिकारी सदर बाब आंबेगावच्या हद्दीत येते, असे सांगून हात झटकत आहे. एकाच वेळी तीन ते चार बिबटे फिरताना दिसत असल्याने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.





