ठगाकडून नोंदणीच्या नावाखाली ट्रॅव्हल एजंटची लूट
आयुक्तांनी गेल्या वर्षी दिले होते आदेश, तरी अद्यापही आरोपी मोकाट
पिंपरी – एका ठगाकडून गेल्या एक वर्षांपासून सातत्याने ट्रॅव्हल एजंटची लूट सुरू आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र तपास सुरू असल्याचे गाणे गात ठगाला मोकाट सोडले आहे. स्वत: पोलीस आयुक्तांनी गंभीरतेने या बाबीची दखल घेत एक वर्षापूर्वीच कारवाईचे आदेश दिले होते, परंतु संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशालाही तपासाच्या नावाखाली वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
कंपनीकरिता तीन महिन्यासाठी भाडेतत्त्वर गाडी पाहिजे, असे सांगून ठग पुणे, मुंबई आणि नाशिक येथील “जस्ट डायल’ ला विचारणा करतो. याबाबत “जस्ट डायल’ कडून माहिती मिळताच ट्रॅव्हल एजंट त्याच्याकडे चौकशी करतात. दररोज पाच हजार रुपये रोख तुम्हाला मिळतील, असे तो वाहन मालकाला सांगतो आणि नोंदणीच्या नावाखाली वाहन मालकांची आर्थिक फसवणूक करतो. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून तो सुरु आहे. याबाबत वर्षभरापूर्वी पोलीस आयुक्तांनी तपास करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले. मात्र अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही. तो आरोपीदेखील अजूनही नागरिकांना लुटत आहे. मात्र “तपास सुरू असल्याचे’ उत्तर पोलीस देत आहे.
अशी आहे फसवणुकीची पध्दत
सचिन पोखरकर नावाचा व्यक्ती आपल्या कंपनीसाठी दैनंदिन भाड्याने गाडी पाहिजे, अशी विचारणा मुंबई, पुणे आणि नाशिक येथील जस्त डायल कंपनीकडे करतो. ज्या वाहन मालकांची नोंद कंपनीकडे आहे. त्या सर्वांना कंपनी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर पाठविते. मग कामाची गरज असलेले वाहन मालक संबंधित व्यक्तीला फोन करतात.
पुणे मुंबई, नाशिक मुंबई, किंवा पुणे नाशिक येथे तीन महिन्यांकरिता अधिकाऱ्यांची ने-आण करण्यासाठी दररोज वाहन पाहिजे असल्याचे तो सांगतो. दररोज पाच हजार रुपये रोख दिले जातील. टोल आणि पार्किंगचे पैसे आमची कंपनी देईल, असे सांगितले जातील. आम्ही यात कमिशन घेऊ शकतो, मात्र ते आम्हाला नको आहे. गाडी कंपनीत जाताना त्याचे रजिस्ट्रेशन आवश्यक असून त्यासाठी दोन हजार 50 रुपये भरावे लागतील. ते पैसे कराराच्या अखेरच्या दिवशी तुम्हाला परत मिळेल, असा विश्वास समोरील व्यक्तीला पोखरकर नावाची व्यक्ती देते. ऑनलाइन पैसे घेतल्यावर तो संपर्क करीत नाही. अशा प्रकारे तो फसवणूक करीत आहे.
आधारकार्ड एक पण सिमकार्ड अनेक
पुणे, मुंबई आणि नाशिक येथील जस्ट डायल कंपनीकडे विचारणा करण्यासाठी तो नेहमी सिमकार्ड बदलत असतो. मात्र नवीन सिमकार्डसाठी तो एकच आधारकार्ड वापरत असल्याचे दिसून आले आहे.
पिंपरी आणि नारायणगावात त्याचे बॅंक खाते
तो सराईत असल्याने कराराबाबत दहा मिनिटे अचूक माहिती देतो. त्यानंतर नोंदणीकरिता पैसे भरण्यासाठी पिंपरी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि नारायणगाव येथील ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्सच्या शाखेचा नंबर देतो. तसेच पेटीएम द्वारेही तो पैसे स्वीकारत असल्याने नागरिकांना त्याच्याबाबत विश्वास वाटतो.
दहा महिन्यांनंतरही आरोपीला अटक नाही
सचिन पोखरकर नावाचा व्यक्ती वाहन मालकांना फसवत असल्याची लेखी तक्रार ज्ञानेश्वर बबन बुरकुले यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे नोव्हेंबर 2018 मध्ये केली. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्याकडे तपास दिला. याबाबत आठ महिन्यांनी त्यांनी सदरचा गुन्हा तांत्रिक तपासाकरिता सायबर क्राईम विभागाकडे पाठविला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार 19 जुलै 2019 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र विविध कारणे सांगून आत्तापर्यंत आरोपीला अटक केलेली नाही. यामुळे तो अजूनही व्यावसायिकांना फसवत आहे. पण पोलीस तपास सुरू असल्याचे उत्तर फिर्यादी बुरकुले यांना मिळत आहे. यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये पोलीस व्यस्त होणार असल्याने आरोपीची अटक आणखी लांबणीवर पडणार आहे.
“”वर्षभरापूर्वी फसवणूक झालेले आम्ही सर्वजण पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना भेटलो. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित आर्थिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले. त्यांनी आठ महिन्यांत तपास करीत आरोपीच्या फोटोसह सर्व माहिती जमा केली. ही माहिती सायबर विभागाकडून गुन्हा दाखल होण्यासाठी चिंचवड पोलिसांकडे पाठविली. गुन्हा दाखल झाला मात्र संबंधित आरोपी अजूनही नागरिकांची फसवणूक करीत आहेत. आयुक्तांनी आदेश देऊनही आरोपीला अटक होत नसेल तर आम्ही आता कोणाकडे गेल्यानंतर कारवाई होईल?”
ज्ञानेश्वर बुरकुले, ट्रॅव्हल एजंट