Pune News | कायम नोकरीच्या आमिषाने फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक रस्त्यांची सफाई करण्यासाठी दरवर्षी कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांची नियुक्ती केली जाते. त्यांच्यामार्फत नियुक्त केलेले सफाई कर्मचारी हे केवळ मर्यादित कालावधीसाठीच काम करत असून, त्यांना पालिकेत कायम करण्यासाठी कोणतीही भरती अथवा प्रक्रिया सुरू नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही व्यक्तींनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिकेत कायम नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत.
या प्रकरणांची चौकशी केल्यानंतर महापालिकेकडून काही कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहेत.शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून निविदा काढत खासगी ठेकेदारांकडून कर्मचारी नियुक्त केले जातात. महापालिकेकडून दरवर्षी सुमारे ९ हजार कंत्राटी कर्मचारी घेतले जातात. हे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नेमले जातात, तसेच दरवर्षी या कामांसाठी निविदा काढल्या जातात.
कोणतीही भरती प्रक्रिया अथवा इतर कारणास्तव या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत घेतले जात नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये आणि स्वतःची आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध राहावे, तसेच कायम नोकरी मिळेल, असे सांगणारे दावे पूर्णतः खोटे असून, अशा प्रकरणांची माहिती तत्काळ संबंधित विभागाला द्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





