कर्जमाफीच्या आश्वासनाने फसवणूक: नेवासा शेतकऱ्यांची पोलिसांत धाव, महायुती मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेवासा- महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्याने नेवासा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. गिडेगावचे अनिल साळुंके आणि दिघीचे बाबासाहेब नागोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन नेवासा पोलिसांना दिले आहे. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले की, पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या त्यांच्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान सहन करावे लागले. सहकारी सोसायट्यांचे कर्ज थकीत झाले असून, 11.5% व्याजामुळे आर्थिक अडचणी वाढल्या. कोरोना काळात शेतीमालाला भाव न मिळाल्याने त्यांची स्थिती बिकट झाली.
महायुतीने निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने याकडे पाठ फिरवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये कर्जमाफी नसल्याचे सांगत हप्ते भरण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या तक्रारींचे निवेदन नेवासा पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांना देण्यात आले.





