Pune News | गुंतवणूकीच्या आमिषाने तरुणाची ४४ लाखांची फसवणूक..
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली असून सायबर चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चतु:शृंगी परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्याने फेब्रुवारीत त्याच्या मोबाइलवर संदेश पाठवून शेअर बाजारातील व्यवहार करणाऱ्या एका कंपनीत अधिकारी असल्याची बतावणी केली होती.
त्यानंतर चोरट्याने तरुणाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात तरुणाने वेळोवेळी ४४ लाख ८१ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तरुणाला परतावा, तसेच मूळ मुद्दल दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तक्रार केली. पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.





