#Foxconn : ‘सेमीकंडक्टर’च्या करारातून फॉक्सकॉनची माघार; आदित्य ठाकरेंची सरकारवर सडकून टीका

मुंबई :- गुजरातमध्ये होऊ घातलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का बसला आहे. फॉक्सकॉन कंपनीने वेदांतासोबतचा करार समाप्त केल्याचे जाहीर केले आहे. यामुळेे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरेलला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला.
फॉक्सकॉनने निवेदन जारी करून कंपनी संयुक्त करारनाम्यातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या सेमी कंडक्टर भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्यानंतर शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीये.
या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव ही जागा अत्यंत योग्य असताना तो गुजरातला का हलवला गेला, याचं उत्तर पहिल्यांदा सरकारने द्यावं. या प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने महाराष्ट्राचं पर्यायाने देशाचं खूप मोठं नुकसान झालंय. खोके सरकारच्या काळात अनेक प्रकल्प इतर राज्यांत पळवले गेले. परंतु वेदांता- फॉक्सकॉनला गुजरातला जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीत ट्वीट केलं आहे की, त्यांनी म्हटले आहे की,” महाराष्ट्रात पूर्णपणे “feasible” असणारा, पण राजकारणापायी महाराष्ट्राबाहेर पळवला गेलेला ‘वेदांता फॅाक्सकॅान’ चा प्रकल्प भारतातूनच रद्द होणार आहे.
विधानसभेत बेकायदेशीर CM नी मोठी घोषणा करून आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट देऊनही, हा प्रकल्प अत्यंत व्यवहार्य ठिकाण असलेल्या पुणे जिल्ह्यातून अचानक गुजरातला का हलवला गेला होता? हे महाराष्ट्र सरकारने आता तरी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सध्याच्या खोके सरकारने अनेक महत्वाचे उद्योग आणि प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जाऊ दिले, पण वेदांता फॉक्सकॉनसारखा महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेला प्रकल्प शेजारच्या गुजरात राज्यात जाऊ देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे होते, असंही त्यांनी म्हटले आहेे.
आज आपण पाहतोय ह्या प्रकल्पाला शेवटच्या क्षणी सगळ्यात व्यवहार्य पर्याय असलेल्या महाराष्ट्रातून हलवल्याचा काय परिणाम झालाय ते! भारताला आणि भारतातील तरूण बेरोजगारांना जागतिक स्तरावरच्या आर्थिक प्रगतीपासून वंचित रहावं लागलंय! तेही केवळ सत्ताधीशांच्या महत्वाकांक्षी क्रूर राजकारणामुळे आणि भेदभावामुळे! असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहेे.
सेमिकंडक्टरची केली जाणार होती निर्मिती…
वेदांता ग्रुपसोबतच्या भागीदारीतील प्रकल्पातून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडणार आहे. गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी एकत्र येत गुजरातमध्ये 19.5 बिलियन डॉलर गुंतवणुकीचा करार केला होता.
यातून सेमिकंडक्टरची निर्मिती केली जाणार होती. दरम्यान तैवानस्थित फॉक्सकॉननं आपण या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलंय. गेल्या वर्षी सत्तांतर नाट्यादरम्यान हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता.




