तालिबानचे समर्थन करणाऱ्या चौदा जणांना आसामात अटक
Updated On:

गुवाहाटी – सोशल मिडीयात तालिबानचे समर्थन करणारा मजकूर टाकल्याबद्दल आसाम पोलिसांनी चौदा जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून आसामच्या विविधभागातून या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात आयटी कायदा, सीआरपीसी आदि कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मिडीयात काही प्रक्षोभक मजकूर प्रक्षेपित केला जात नाही ना यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे आसाम पोलिसांनी सांगितले.तालिबानच्या बाजूने त्यांचे समर्थन करणाऱ्या पोस्ट कोणी सोशल मिडीयावर टाकल्या तर त्याची माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहनही पोलिसांनी राज्यातील जनतेला केले आहे.
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर काही जणांनी उन्माद आल्यासारख्या पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे आसामातील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे असेही संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





