संडे स्पेशल : शरदागमन

एकेका झाडाला एकेक महिना बहाल करावयाचा झाल्यास सप्टेंबर हा पारिजातकाचा महिना म्हणावा लागेल. पारिजातकाची जन्मकथा मोठीच वेधक आहे. झालं असं की, देवांना पाहिजे होतं अमृत. त्यासाठी अख्खा क्षीरसागर ढवळून काढावा लागणार होता. ही सामान्य बाब तर नव्हतीच, पण निव्वळ देवांच्या आटोक्यातलीही नव्हती. त्यासाठी त्यांना दानवांची मदत घ्यावी लागली.
मग मंदार पर्वताची रवी करावी लागली. ती टेकवण्याकरता विष्णूंना कूर्मावतार घ्यावा लागला. वासुकी सर्पाची दोरी करावी लागली आणि तिला पकडून एकीकडून देवांनी अन् दुसरीकडून दानवांनी समुद्रमंथन केले. या समुद्रमंथनातून अमृतासकट चौदा रत्ने बाहेर आली. त्यातले लक्ष्मी आणि कौस्तुभ यानंतरचे तिसरे रत्न म्हणजे पारिजातकाचे झाड. इंद्र हा देवांचा राजा. त्यानं तत्काळ त्याला स्वीकारून स्वर्गातल्या नंदनवनात लावलं. तेव्हापासून पाच देववृक्षांत (इतर मंदार, संतान, हरिचंदन आणि कल्पवृक्ष) पारिजातकाची गणना व्हायला लागली.
एकदा देवर्षी नारद स्वर्गातून फिरत-फिरत द्वारकेला आले आणि स्वर्गातल्या या प्राजक्ताचे फूल त्यांनी कृष्णाला दिले. कृष्णाने रुक्मिणीला. या एकाच फुलाचा दरवळ एवढा होता की, त्याने अख्खी द्वारका सुगंधित झाली. ’हे फूल तिलाच का दिले, मला का नाही’ म्हणून सत्यभामा रुसली. आता तर तिला सगळे झाडच हवे होते! काय करावे या स्त्रीहट्टाला? शेवटी भामा मनीचा रोष मावळण्यासाठी कृष्णानं तो वृक्ष पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. परंतु इंद्र कृष्णाला तो काही देईना, तेव्हा कृष्णाला इंद्राशी युद्धाची भाषा वापरावी लागली. अखेर हे देवपुष्प सत्यभामेच्या दारात लागले! (पुढे ‘फुले का पडती शेजारी?’ हा मत्सर प्रश्न निर्माण झाला, ते असो.)
पारिजातकाचं लहानपणी माझं एक संख्यात्मक फक्त नातं होतं. आजीला चातुर्मासात महादेवाला लाखोली वाहण्यासाठी पारिजातकाची फुलं आणून द्यावी लागायची. आजीनं अंगणातल्या वृंदावनासमोरचा मोठा दगडी महादेव उचलून, धुऊन देवघरात ठेवलेला असायचा. त्याला एक लाख फुले म्हणजे ‘लाखोली’ वाहणे, हे तिचे व्रत. खरोखर एक-एक फूल मोजून एक लाख फुलांची भरती होईपर्यंत फुले वाहणे म्हणजे लाखोली वाहणे. ती फक्त महादेव याच देवाला वाहतात आणि फक्त पारिजातकाचीच फुले संख्येने एवढी भरणे शक्य असते. हिंदीत पारिजातकाचे नाव ‘हरसिंगार’ का आहे, हे आता कळले. या पळापळीत या फुलांकडे डोळे भरून पाहणे झाले नाही वा कधी नाक भरून गंध घेणे झाले नाही. तोबा-तोबा! देवाला वाहायच्या फुलांचा गंध घेण्यास सक्त मनाई असते. म्हणून लहानपणी माझी पारिजातकाशी नीट ओळख झाली, तरी दोस्ती अशी झालीच नाही. म्हणून म्हटलं- माझं-त्याचं नातं लहानपणी फक्त संख्यात्मक राहिलं, गुणात्मक कधी झालंच नाही. वयाच्या विशीनंतर तो भेटला औरंगाबादला.
दिसायलाच किती नाजुकसाजुक आहे हा. आठ पाकळ्यांची त्याची फुलं म्हणजे मार्दवाची मिसालच. त्याच्या पाकळ्या तर जाई-जुईपेक्षा नाजुक असतात. बोटांच्या चिमटीत एक पाकळी फार न दाबता नुसती पकडून जरी ठेवली, तरी पाणी-पाणी होईल! प्राजक्ताच्या पाकळ्या मोठ्या बारीक चणीच्या आणि आकडेबाज असतात. बासमती तांदळाचा भात ताटात वाढला की, मला दर वेळी या अष्टदलांची आठवण येते. लांबड्या, टोकाला दुभंगलेल्या, मोठ्या कुर्रेबाज अशा असतात त्या. दुसर्या प्रकारच्या प्राजक्ताच्या पाकळ्या थोड्या जाड बुटक्या, एकमेकींना बिलगू पाहणार्या. सहा पाकळ्यांची फुलं म्हणजे शालीन सौंदर्य. गंधाच्या बाबतीत तरतम करता येणार नाही, पण रूपाच्या बाबतीत दोन प्राजक्तांत नक्कीच फरक आहे. पहिली सुंदरी शेलाट्या बांध्याची, तर दुसरी मांसल. या मांसलपणाला उर्दूत छान शब्द आहे- गुदाजबदन.
श्रावण, पारिजात आणि पाऊस असा एक त्रिकोणच आहे. इंदिरा संतांना भारी कौतुक. त्या पारिजाताला ‘श्रावणाचा राजा’ म्हणतात. वारा, पाऊस नि ऊन हे तिघं पारिजाताचे ‘मैत्र जीवाचे’ आहेत, असं म्हणतात. इतकंच नाही, तर मूळचा आपला- स्वर्गातला- पारिजात पृथ्वीवर कसा नांदतोय हे पाहायला आकाशात इंद्रधनू डोकावते, असेही म्हणतात. पारिजाताच्या केसरिया देठांचं कवींना भारी कौतुक. वसंत बापटांनी पारिजातकाचे देठ वनदेवीच्या पायाखाली येऊन तिच्या मेंदीमुळे लालीलाल झाले, अशी उपपत्ती मांडली आहे. मराठी कवीपेक्षाही विश्वकवींनी या सौंदर्यवर्णनात बाजी मारली आहे, हे कबूलच करायला हवे-
सुंदर, तुमि असेछिले प्राते
अरुण बरन पारिजात लये हाते
सध्या कवठाला छान फळं लागलीत. सगळ्यांना पिकलेल्या कवठाची चटणी आवडते.पिकलेले कवठ गोल आकाराचे, पाच ते सहा सेंमी व्यासाचे, कठीण कवचाचे आणि सुवासिक असते. त्यातला गर तांबूस विटकरी रंगाचा असतो. खाणारे तो नुसताही खातात, खाऊ शकतात. चटणीखेरीज त्याचे जॅम, जेली आणि सरबतही करता येते. बर्फीसुद्धा करतात. माकड आणि हत्ती यांनाही कवठफळे आवडतात. म्हणून तर त्याला संस्कृतात ‘कपिप्रिय’, तर इंग्रजीत ‘एलिफंट अॅपल’ असं नाव आहे.
कवठाचे झाड सदाहरित असते. उंची सहा ते बारा मीटर, दाट पर्णसंभार असलेले ते आहे. त्याची साल खरखरीत, भेगाळलेली, काळपट रंगाची दिसते. पानांच्या बगलेत अत्यंत तीक्ष्ण, सरळ आणि मजबूत काटे असतात. वसंत ऋतूत त्यांना मोहर येतो आणि सप्टेंबरात फळे लागतात. महाशिवरात्रीच्या सुमारास बाजारात ती विकायला पण येतात.
सध्या सागवानाच्या झाडांना फुलांच्या जागी बोराच्या आकाराची फळे लागली आहेत. सुबाभळीला खूपशा शेंगा आलेल्या आहेत. बकाना लिंबाला जांभळी फुलं लागली आहेत. कापसाला पण पिवळी, सुंदर फुलं येऊ लागलीत. शेवग्याला फुलं लगडलीत. पिवळ्या कण्हेरीला आणि सगळ्या झुडपांना फुलंच फुलं लगडलेली दिसताहेत.





