लाचखोर दोन नगररचनाकार, आर्किटेक्टला चार वर्षे सक्तमजुरी

सातारा – जमिनीचा बिगरशेती दाखला देण्यासाठी चार लाखांची लाच घेणारा आर्किटेक्ट राहुल हणमंत भोकरे (वय 32, रा. कमानी हौद, सातारा), नगररचनाकार आसाराम मोहनराव चंदनशिव (वय 55, रा. कोथरुड, पुणे), सहाय्यक नगररचनाकार संजय तानाजी फरांदे (वय 54, रा. सदरबझार, सातारा) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीगत अशी, पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील 28 हजार चौरस मीटर जमीन बिगरशेती करण्याचा प्रस्ताव प्रकाश रघुनाथ माने (वय 57, रा. शुक्रवार पेठ, फलटण) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. तेथून हा प्रस्ताव रेखांकन व अभिप्रायासाठी सहाय्यक संचालक, नगररचनाकार कार्यालयात आला होता.
रेखांकन व कागदपत्रांची पूर्तता करून सहाय्यक संचालकांच्याकडे अभिप्राय सादर करण्यासाठी नगररचनाकार चंदनशिव याने 26 सप्टेंबर 2013 रोजी प्रकाश माने यांच्याकडे सात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर चंदनशिवने सहाय्यक नगररचनाकार फरांदेला भेटायला सांगितले. फरांदेने माने यांना आर्किटेक्ट भोकरे यांच्याशी चर्चा करायला सांगितले.
भोकरेने पाच लाख रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडीनंतर चार लाख रुपये देण्याचे ठरले. 17 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री आठच्या सुमारास पोवई नाक्यावरील एका इमारतीत भोकरे याच्याकरवी चार लाखांची लाच घेताना चंदनशिव आणि फरांदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याच्या सुनावणीत पाच साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष म्हणजे एकही साक्षीदार फितूर झाला नाही. सरकार पक्षाने दाखल केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश मोरे यांनी तिघांना प्रत्येकी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.





