Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

पवन मावळ : पवन मावळ हा मावळ तालुक्यातील प्रमुख भात उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत पारंपरिक शेतीत बदल घडवण्यास सुरुवात केली आहे. चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचा प्रयोग सुरू असून, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सांगवंडे, गहुंजे या गावांमध्ये सध्या चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे काम जोरात सुरू आहे. यावर्षी या परिसरातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत वापरण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी दिली आहे.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भात पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला वेग दिला आहे. दारुंब्रे गावातील प्रगतशील शेतकरी रामदास सोरटे यांच्या दोन एकर शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे.
या पद्धतीत शेतकरी दोरीच्या सहाय्याने २५ बाय २५ सेंटीमीटर अंतरावर भात रोपांची लागवड करत आहेत. प्रत्येक गाठीत फक्त दोन ते तीन रोपे लावली जात आहेत. यामुळे भाताला अधिक मोकळे वातावरण मिळते आणि पाण्याचा योग्य वापर होतो. याशिवाय लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी युरिया ब्रिकेट खत गोळ्या चार रोपांच्या मधोमध टाकण्यात येणार आहेत, ज्यामुळे भाताच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
यावर्षी मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र, या पद्धतीमुळे कमी मजुरांमध्येही शेती शक्य होत असल्याने शेतकरी एकमेकांच्या मदतीने भात लागवड करत आहेत. पावसामुळे दरवर्षी नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी चारसूत्री पद्धतीच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल दर्शवला आहे. प्रगतीशील शेतकरी रामदास सोरटे यांनी सांगितले की, चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने उत्पन्नात वाढ होते. बियाणे कमी लागते. खताचा खर्च वाचतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न येते. दारुंब्रे गावात शेतकरी चारसूत्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड करत असतात.
सद्यस्थितीला पवन मावळ भागात भात लागवडीना सुरु झाल्या आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवडी करू लागले आहेत. चारसूत्री, एस. आर. टी. लागवड, यंत्राने लागवड पद्धतीने शेतकरी लागवडी करू लागले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान वापरून भात उत्पादनात वाढ करणे हेच कृषि विभागाचे ध्येय आहे.
– विकास गोसावी
सहाय्यक कृषि अधिकारी, सोमाटणे





