भोरच्या श्रीपतीनगरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; 26 लाखांचा मुद्देमाल लंपास

भोर – भोर पोलीस स्टेशनसमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीपतीनगर (भोर, जि. पुणे) येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली चार घरे फोडली. तेथून 18 तोळे सोने, अडीच किलो चांदी, 9 लाख रुपये रोख असा एकूण 26 लाख 35 हजारांचा मुद्देमाल चोरून चोरटे फरार झाले आहेत. भोर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव पुरोहित (रा. श्रीपतीनगर, भोर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्वान पथकाने घरांची पाहणी केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक मोहिते आणि अमोल शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करपे करत आहेत.
शहरातील पोलिस ठाण्यापासून १०० ते २०० मीटर अंतरावरील बंद असलेली चार घरे फोडून रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि.१३) पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चारही घरे बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती सोमवारी सकाळी घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले.
शहरातील श्रीपतीनगर येथील भारती दीपक मोरे, सविता विलास जेधे, माधव पुरोहित, ॠषीकेश वंजारी यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती मोरे या रविवारी दुपारी कुटुंबासह बाहेरगावी लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
घरातील सर्व खोल्यांमधील कपाटांची आणि ड्रॉवरची उलथापालथ केली. दिवाणमधील सामानही काढून फेकून दिले. भारती मोरे यांनी दिवाणाच्या आत कपड्यांमध्ये 6 लाखांची रोकड असलेली पर्स ठेवली होती. त्या पर्समधील पैसे चोरट्यांनी काढून नेले. भारती मोरे यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेत आहे. त्याला पैसे पाठविण्यासाठी त्यांनी दागिने गहाण ठेवून आणि नातेवाईकांकडून पैसे जमा केले होते.
दुसरी चोरी पोलिस ठाण्यासमोर सविता जेधे यांच्या घरात झाली. त्या सोमवारी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी आपल्या मूळगावी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटलेला आणि दरवाजा उघडा होता. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले तर घरातील सर्व सामान अस्थाव्यस्त केलेले दिसले. त्यांच्या कपाटातील लॉकर तोडून छोट्या पाकीटातील 50 हजारांची रोख रक्कम चोरून नेली.
तिसरी चोरी माधव पुरोहित यांच्या घरी झाली. घरातील सर्वजन पुण्याला गेले त्यावेळी चोरांनी दरवाची कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील 14 तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि 2 लाखाची रोकड चोरून नेली. घरात लग्न समारंभ असल्याने सोने चांदी बनवून ठेवले होते आणि रोकड आणली होती.
चौथी चोरी भानुदास कृष्णा वंजारी यांच्या घरी झाली. त्यांच्या घरातून 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 4 तोळे सोन्याचे दागिने चोरांनी पसार केले. याप्रकरणी भोर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भोर पोलिस करत आहेत.





