गॅस गळतीमुळे भरदुपारी आग ; आगीत चार मोटारी जळून खाक

पिंपळे गुरव : रामनगर काटेपुरम चौक ते मयूर नगरी परिसर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) काम सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात गॅस पाईपलाईनमधून गळती झाली. या गळतीमुळे भर दुपारी आग लागली. या आगीमध्ये रस्त्यालगतच्या 4 मोटारी जळून खाक झाल्या.
आगीच्या ज्वाला सुमारे 20 ते 25 फूट असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. रहाटणी येथील अग्निशामक दलाची बंब त्वरित दाखल झाल्यामुळे मोठी हानी टळली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. परिसरात जमलेल्या नागरिकांना दूर करण्याचे प्रयत्न करताना दिसून आले. रस्त्यालगत 9 ते 10 चारचाकी वाहने पार्क केली होती. यातील 4 चारचाकी वाहने जळून खाक झाली.
एमएनजीएल अधिकारी माणिक कदम यांनी माहितीनुसार, गॅस पाईप लाईनला लिकेज झाल्यामुळे पाईपलाईनमधून गॅस बाहेर पडला आणि उन्हाच्या तडाखा असल्याने त्याने पेट घेतला.
एम.एन.जी.एल कर्मचाऱ्यांनी रस्ता खोदकाम करण्यासाठी कुठलीही महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम केले. खोदकाम करताना एमएनजीएलची पाईप फुटून गॅस गळती झाल्याने ही आग लागली, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे, असे अग्निशामक दलाचे सब ऑफिसर ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले.





