Boisar MIDC : बोईसर एमआयडीसी वायु गळतीप्रकरणी कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औषध निर्माण कारखान्यात विषारी वायूची बाधा होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला तर दोन कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. या दुर्घटनेप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा नोंद करण्यात आला असून वायुगळतीच्या घटनेची औद्योगिक व आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मेडली फार्मास्युटिकल्स कारखान्यात एकूण १५० कामगार संख्या असून वायुगळती होऊन त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी समजतात रुग्णालय परिसरात मृत कामगारांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कारखाना व्यवस्थापना विरोधात संताप व्यक्त केला. कमलेश यादव या मृत कामगाराच्या भावाने कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक उपकरणांचा अभाव असल्याचे सांगितले.
तसेच वायूबाधा झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक ते दीड तासांचा उशीर झाल्याचा आरोप केला. आमदार राजेंद्र गावित, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कारखाना व रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.





