कमी दरात सोने देणाऱ्या पुण्यातील चार भामट्यांना अटक

सातारा -सांगली येथील व्यापाऱ्याला कमी दरात सोने देतो असे सांगून त्याची 25 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोल नाका येथे अटक केली आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून साडेबारा लाखाच्या रोकडसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुजंगराव निंबाळकर (वय 48, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून प्रवीण महादेव खिराडे (वय 37, रा. खामगाव, जि. बुलढाणा), मानसी सुरेश शिंदे (वय 30, रा. सारोळा, ता. भोर, सध्या रा. वाघजाई मंदिर, कोथरूड) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एक महिला संशयित आहे. मात्र तिचे नाव समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार 20 जून 2023 रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान सांगली येथील फळ मार्केटमध्ये मयूर सुभाष जैन यांच्याकडे संबंधित आरोपींनी सोन्याची बिस्कीट दाखवून स्वस्तात सोने मिळवून देतो अशी बतावणी केली. फिर्यादींकडून रोख रक्कम पंचवीस लाख रुपये साथीदारामार्फत घेऊन तेथून ते पसार झाले. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रक्कम मोठी असल्याने गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह संबंधित आरोपी पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यांच्या आदेशाप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनेवाडी टोल नाका येथे सापळा रचला. या नाकाबंदी दरम्यान सायंकाळी सात वाजता पुण्यातील
संशयित जीप नावाच्या वाहनाने पुण्याकडे जाताना दिसले.
या पथकाने हे वाहन अडवून संबंधितांची कसून चौकशी केली. त्यावेळी निंबाळकर यांच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे साडेबारा लाखांची रोकड व वाहन असे 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निंबाळकर हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणामध्ये अधिक चौकशी सुरू आहे. संबंधित आरोपींना सांगली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, नितीन जाधव, सुशांत माळी, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे, सागर मोहिते, महिला पोलिस रूपाली शिंदे, प्रियंका देशमुख, नवनाथ पवळे, जटप्पा लोणार यांनी कारवाईत भाग घेतला होता.





