पुणे – कोंढवा पोलीस स्टेशन आणि लष्करी गुप्तचर विभाग (मिलिटरी इंटेलिजन्स) यांच्या संयुक्त माहितीवरून कोंढवा बुद्रुक येथील नॉटींग हिल सोसायटीमागील के.ई.सी. लेबर कॅम्पवर छापा टाकून चार बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात राहण्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्यात खालील चार बांगलादेशी नागरिक सापडले. स्वप्न निधुभुषण मंडल (वय ३९), मिथुनकुमार दिलीप मंडल (वय ३१) , संधीरकुमार मंडल (वय ३७), दिलीप निमाई मंडल (वय ३८, सर्व रा. बांगलादेश) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार तानाजी चंद्रसेन सरडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन थोरात, पोलीस शिपाई हसेन शेख, महिला अमलदार साईदा मकानदार व वैष्णवी भोपळे यांनी शोध मोहीम राबवली. त्यांच्याकडे कोणताही व्हिसा अथवा ओळखपत्र नव्हते, त्यांच्या केलेल्या चौकशीत त्यांनी बांगलादेशातून तीन ते चार महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. भारतात प्रवेश करताना अनधिकृतपणे सीमा ओलांडून ते आले आहेत, त्यांच्याकडून चार मोबाइल हस्तगत करण्यात आले. या आरोपींवर परकीय नागरिक कायदा १९४६, पारपत्र अधिनियम १९६७ व इतर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस ठाण्यामार्फत सुरू असून या घुसखोरीमागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का? याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद व्यक्तींची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.