Nagar | कुठल्याही मोठ्या नेत्याशिवाय एकाकी लढलो

श्रीरामपूर: – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली. एकही मोठा नेता आपल्या पाठीशी नसताना आपण एकाकी लढत दिली.परंतु मत विभागणीमुळे आपला पराभव झाल्याचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले.
मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी माजी नगरसेवक अँड. संतोष कांबळे यांनी सर्वांचे स्वागत करून विधानसभा निवडणुकीत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कांबळे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिवसेना उमेदवार म्हणून आपल्याला अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यानंतर मला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्री माझ्यावरील गोळीबारपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.परंतु संत-महंत यांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी उभे राहिल्याने अनेक संकटांना तोंड देत आपण ही निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती. परंतु मत विभागणीमुळे आपला पराभव झाला असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या बैठकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष डहाळे, संजय बाहुले, सागर कुदळे, शिवाजी सिनारे, दत्तात्रय शिंदे, हरिभाऊ तुवर, किशोर वाडीले, रवींद्र जाधव यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना विधानपरिषदेवर अथवा महामंडळाचे अध्यक्षपद देऊन श्रीरामपूर मतदार संघातील विकासासाठी राजकीय बळ देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मुंबईला मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळेआगामी श्रीरामपूर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह सर्व निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढविण्याची मागणी करण्यात आली.
त्यानुसार कांबळे यांनी आगामी सर्व निवडणुका आपण पूर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्ष व कार्यकर्त्यांच्या बळावर लढणार असल्याचे जाहीर केले. शेवटी शुभम ताके यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. रवींद्र काबुडके, अशोक साळुंके, सुरेश झारेकर,अरुण काळे, दाजीबा जाधव,अझर शेख, योगेश भामरे,राहुल भंडारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





