माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

छ. संभाजीनगर –माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पिक-अप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला.
संजना जाधव या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गाठीभेठींसाठी दौरे सुरु आहेत. अशात संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिक-अप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले.





